संगमनेर(DSNews24/किरण पुरी) लोकशाही, संसदीय पद्धत आणि गुप्त मतदान या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेत वर्गप्रतिनीधींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणुक अतिशय आनंददायी वातावरणात पार पडली. निवडणूकीत विद्यार्थ्यांनी मतदात्याची भूमिका बजावली. ही निवडणूक इयत्ता पाचवी सहावी व सातवी या वर्गांच्या वर्गप्रतिनीधींसाठी घेण्यात आली. तिन्ही वर्गाचे मिळून 21 जणांनी उमेदवारी केली होती.
विशेषतः ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये उमेदवार आपले उमेदवारी फॉर्म भरतो अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. तसेच चिन्ह म्हणून सर्व शैक्षणिक साधनांचा समावेश होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्याकडून छोटीसी अनामत रक्कम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनीही जोरदार प्रचार केला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने आपला निवडणूक अजेंडाही बनवला होता. निवडणुकीच्या दिवशी अगदी हुबेहूब निवडणुकीचे वातावरण तयार करण्यात आले होते. त्यामध्ये बूथ लावणे.
विद्यार्थ्यांना बुथवरून आपल्या नावाची चिठ्ठी देणे. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शनपर बोर्ड लावणे. तसेच मतदान कक्षाच्या बाहेर सिक्युरिटी उभा करणे. मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2 व मतदान अधिकारी 3 अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करणे. मतदान कक्ष तसेच मतपेटी व बॅलेट पेपर अशा सर्व गोष्टी अगदी तंतोतंत केलेल्या होत्या. विद्यार्थ्यांना सुंदर अशा मतदानाची अनुभूती यावेळी मिळाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी विद्याप्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
