उपसरपंच सुभाष डोंगरे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भिमाजी डोंगरे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कार शिवसेनेच्या उपनेत्या मा.आ. जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर गुरूसिद्धेवर शिवाचार्य महास्वामीजी, जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, राज्य निवेदक बाबासाहेब मेमाणे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. तसेच पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील इंजिनिअरींग असोसिएशन, सामाणी या ठिकाणी पार पडला. यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

तत्पूर्वी उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आपल्या मनोगतून जीवनातील काही कामांचा अनुभव सांगितला. यावेळी गुरूसिद्धेवर शिवाचार्य महास्वामीजी महाराज तसेच शिवसेनेच्या उपनेत्या जयश्रीताई जाधव यांनी देखील सुभाष डोंगरे यांच्या कार्याचे कौतुक केले.

दरम्यान उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील घडामोडींवर वॉच ठेवण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. साईट गटारींची कामे करून घेतली. दळणवळणाच्या दृष्टीने सीमेंट काँक्रिटीकरण रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेत सोलर बसविणे, प्राथमिक उप आरोग्य केंद्र चालू करणे, कचरा घंटा गाडी ग्रामपंचायतीसाठी, आरोग्य, डोळे, रक्तदान शिबीर आयोजन करणे असे विविध कामे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी करून घेतली. तसेच काही वेळा गावच्या विकासासाठी धडाडीचे निर्णय देखील घेतले.

तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुभाष डोंगरे यांनी पठार भागातील रस्त्यांविषयी आवाज उठवला. विजेच्या प्रश्नांसाठी महावितरण कार्यालयावर आंदोलन, उपोषण केले. त्याचबरोबर पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये वंचित गावांचा समावेश करण्यात यावा यासाठी तब्बल आठ दिवस आमरण उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सुभाष डोंगरे यांची पारनेर व संगमनेर तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण झाली. सामाजिक प्रश्नांवर भूमिका बजावत असल्याने याच कार्याची दखल कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने घेत सुभाष डोंगरे यांना राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कार देण्यात आला.

सुभाष डोंगरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्रीताई थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, थोरात कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, माजी चेअरमन बाबा ओहोळ, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर तसेच साकूर पठार भागासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment