अखेर साकूरमधील मिसिंग कांतीलाल शेंडगे यांचा शोध लागला, पोलिसांनी थेट परराज्यातून…..

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) लोकांकडे कामाचे उधारीचे पैसे वारंवार मागूनही न दिल्याने वैतागलेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कांतीलाल दौलत शेंडगे ही दिव्यांग व्यक्ती ५ जुलै रोजी घर सोडून निघून गेली होती. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात मिसींग तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र कांतीलाल यांनी घर सोडून जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत काही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करत त्या लोकांकडे माझे कष्टाचे लाखो रुपये गुंतून पडले असून त्यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशा आशयाची चिठ्ठी सापडली होती. त्यामुळे या प्रकरणाची पठार भागात चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान अहिल्यानगरचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकातील पो. कॉ. महादेव हांडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी कांतीलाल शेंडगे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

तसेच घारगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकाने तपासात गती देत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कांतीलाल शेंडगे कुठे आहे याचा अचूक शोध घेतला. त्यानंतर पथकातील पो. कॉ. महादेव हांडे, पो.कॉ. प्रमोद गाडेकर, पो.कॉ सुभाष बोडखे यांनी थेट कर्नाटक राज्यात जाऊन बेंगलोर येथून मिसिंग कांतीलाल शेंडगे यांना सुखरूप आपल्या ताब्यात घेतले. यावेळी कांतीलाल यांचा जबाब घेण्यात आला. त्यानंतर कांतीलाल यांना सुखरूपपणे त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले. तसेच कांतीलाल शेंडगे यांचा शोध लावण्यास घारगाव पोलिसांना यश मिळाल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

तक्रारीत काय म्हटले होते?

कांतीलाल यांच्या पत्नीने मिसिंग तक्रारीत म्हटले होते की, कांतीलाल यांनी पंधरा वर्षापुर्वी जे.सी.बी. घेतला होता व ते साकुर तसेच परीसरात जे.सी. बी. चालवत होते. तसेच पाच वर्षापुर्वी त्यांनी बिरेवाडी, साकुर भागातील लोकांकडे जेसीबीने काम केले. मात्र या कामाच्या उधारीचे पैसे लोकांकडे थकले होते, त्यामुळे जे.सी.बी. वर काढलेले कर्ज थकलेले होते. त्यामुळे तीन वर्षापुर्वी कांतीलाल यांनी जे.सी.बी. विकून टाकला. परंतु पती अपंग असल्यामुळे ते काहीही कामधंदा करु शकत नसल्याने ते घरीच होते. परंतु जे.सी.बी. ने काम केलेले उधारीचे पैसे लोकांकडे वेळोवेळी मागुन देखील त्यांनी दिले नाही.

त्यामुळे ते सध्या वैतागलेले होते. ५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पती कांतीलाल हे मला म्हणाले की, मी बाहेरगावी चाललो आहे असे सांगुन ते घरातुन निघून गेले. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास पती कांतीलाल यांचा फोन आला व फोनवर मला विचारले की मुले कशी काय आहे त्यावेळी त्यांना सांगितले की ते व्यवस्थित आहे असे म्हणाले व त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला परंतु त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर मी नातेवाईकांकडे पती कांतीलाल यांची विचारपुस केली. परंतु पतीबाबात काही माहीती मिळाली नाही. त्यानंतर ७ जुलै रोजी सकाळी कांतीलाल यांची हिशोबाची डायरी उचकली त्यावेळी मला डायरीमध्ये एक लिहिलेली चिठ्ठी सापडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment