मुंबई : सध्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये चड्डी बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचादेखील एक व्हिडोओ व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर खासकरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. अशामध्ये बुधवारी (16 जुलै) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सर्व मविआचे नेते यावेळी टॉवेल बनियनवर विधानभवनात पोहोचले. तसेच ‘चड्डी बनियन गँग हाय हाय’, ‘या गुंडाराज सरकारचे करायचे काय?’, ‘खाली डोकं वर पाय’, ‘या लुटारू सरकारचे करायचे काय?’, ‘खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या. यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.
