पारनेर(DSNews24/किरण पुरी) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी दुपारी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमा दरम्यान जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गायकवाड आले असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की केली. हल्लेखोरांनी गायकवाड यांच्या गाडीची तोडफोड केली आणि त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.
संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राग हल्ल्यामागील कारण असल्याचे समोर आले आहे. या घटनेत गायकवाड यांना किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या भ्याड हल्ल्याचा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
संतोष वाडेकर म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी अनेक वर्षे लढा दिला आहे. त्यांच्यावरील हल्ला हा लोकशाही मूल्यांवर आणि पुरोगामी विचारसरणीवर घाला आहे. सरकारने हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. पोलिसांनी मुख्य आरोपी दीपक काटे याच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली असून, संभाजी ब्रिगेडनेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
