वडगाव सावताळ येथे रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून मोफत तपासणी शिबिर

पारनेर(DSNews24 ) तालुक्यातील वडगाव सावताळ येथे निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून आणि आप्पासाहेब साळुंके पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने गुरुवार, 31 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिबिरात मोफत रक्त तपासणी, हृदयरोग तपासणी, डोळे तपासणी आणि सर्व आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया यासारख्या सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती रवींद्र राजदेव, सरपंच संजय रोकडे आणि डॉ. सुधाकर साळुंके यांनी दिली. हा कार्यक्रम वडगाव सावताळ ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित आहे.

या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून, आरोग्य सुविधांच्या अभावामुळे त्रस्त असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. रवींद्र राजदेव यांनी सामाजिक कार्यातून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट आणि कर्जुले हर्या व टाकळी ढोकेश्वर गणात निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रस्थापित नेत्यांना आव्हान देत त्यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि निवडणूक रणनीतीमुळे येत्या निवडणुकीत त्यांचे पाऊलखुणा कसे उमटतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या शिबिराच्या आयोजनामुळे वडगाव सावताळसह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment