संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भिमाजी डोंगरे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानने देखील उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट उपसरपंच २०२५ पुरस्कार जाहीर केला आहे. १७ ऑगस्ट २०२५ रोजी साईबाबांच्या पुण्यनगरीत सुभाष डोंगरे यांचा भव्य गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन, प्रसिद्ध समाजसेविका मोनिका पीटर, पुणे येथील उद्योजक दत्तात्रय करपे, गणपतराव शिंदे, बाबासाहेब मेमाणे उपस्थित असणार आहे.
उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील घडामोडींवर वॉच ठेवण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. साईट गटारींची कामे करून घेतली. दळणवळणाच्या दृष्टीने सीमेंट काँक्रिटीकरण रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेत सोलर बसविणे, प्राथमिक उप आरोग्य केंद्र चालू करणे, कचरा घंटा गाडी ग्रामपंचायतीसाठी, आरोग्य, डोळे, रक्तदान शिबीर आयोजन करणे असे विविध कामे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी करून घेतली. तसेच काही वेळा गावच्या विकासासाठी धडाडीचे निर्णय देखील घेतले.
तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुभाष डोंगरे यांनी पठार भागातील रस्त्यांविषयी आवाज उठवला. विजेच्या प्रश्नांसाठी महावितरण कार्यालयावर आंदोलन, उपोषण केले. त्याचबरोबर पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये वंचित गावांचा समावेश करण्यात यावा यासाठी तब्बल आठ दिवस आमरण उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सुभाष डोंगरे यांची पारनेर व संगमनेर तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण झाली.
सामाजिक प्रश्नांवर भूमिका बजावत असल्याने याच कार्याची दखल कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने घेत १३ जुलै रोजी सुभाष डोंगरे यांना राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानने देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा सुभाष डोंगरे यांचा सन्मान होत असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
