संगमनेरात रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार, महायुतीचा महाविजय मेळावा

संगमनेर(DSNews24) आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच जाणता राजा मैदानावर महायुतीचा महा विजय मेळावा देखील होणारं आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षापासून एकहाती सत्ता असणार्यांचे साम्राज्य उलथवून टाकत एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ यांच्या रूपाने संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असणार्या आमदार अमोल खताळ व महायुती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेतलेले राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्कमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई , माजी खा डॉ सुजय विखे पा यांच्यासह नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे,  माजी खासदार सदाशिव लोखंडे, आ भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख सुनिता शेळके व दक्षिण जिल्हा प्रमुख विमल पुंडे आणि जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

या महाविजय मेळाव्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून विधिवत पूजा करत मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर कार्यालयापासून जाणता राजा मैदानापर्यंत शिवसेना महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांना भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल जाहीर सभेच्या माध्यमातून संगमनेरकर जनतेचे आभार मानणार आहेत. तरी या जाहीर सभेसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Comment