संगमनेर(DSNews24/किरण पुरी) शेतकऱ्यांसमवेत कायम शेतात राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा होय. बैलपोळा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बाजारपेठेत सर्जा-राजाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी आले आहेत. आज बैलपोळा असल्याने सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी शेतकरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. साकूर पठार भागातील गावागावांमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो.
आज बैलपोळा असल्याने साकूर बाजारपेठ बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीचे बैल, आणि घुंगराच्या माळांनी दुकाने सजली आहेत. यामध्ये बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगबिरंगी झुल, घुंगरांचा पट्टा, हिरव्या रंगाची गोंडे, पितळी घंटा, प्लास्टिकची कवड्यांच्या माळा, घुंगरांच्या माळा दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पोळ्याच्या दिवशी नटून थटून सजलेल्या आपल्या सर्जाराजाला नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात बनवलेली दिटमणीही बाजारात दाखल झाली आहे. या सर्व साहित्याची खरेदीसाठी बळीराजाची धडपड सुरू झालेली दिसून येत आहे.
तसेच घरी अनेक जण मातीपासून तयार केलेल्या बैलांची पूजा करतात. त्यामुळे मातीच्या बैलांची दुकाने थाटली असून ही मातीचे बैल खरेदी देखील अनेकजण करत आहेत. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत. हा उत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठ सजली आहे. यंदा शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
आज सायंकाळी गावागावात बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच गावातील मंदिरासमोर बैलांना बळीराजा घेऊन जात असतो. त्यामुळे साकूर पठार भागात आज संध्याकाळी बैलपोळ्याचा उत्साह बघायला मिळणार आहे.
