ब्रेकिंग! पोळ्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

जळगाव : पोळा सणाच्या दिवशी शेतकऱ्याकडे आनंदाचे वातावरण असते. आपल्या सर्जा राजाची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते. मात्र याच पोळ्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांना नदीवर अंघोळीसाठी नदीत घेऊन गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील सुशील सुनील इंगळे (वय २२) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोळा सण असल्याने शेतकऱ्यांच्या घरी तयारी केली जात असते. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांद्यांना तेल लावून त्यांची अंघोळ घातली जात असते. यासाठी नदीवर किंवा गावातील हौदावर बैलांना घेऊन शेतकरी वर्ग जात असतो. त्यानुसार सुशील इंगळे हा देखील नदीवर बैलांना घेऊन गेला होता.

आज पोळा सण असल्याने सुशील आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी २१ ऑगस्टला सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर नदीकाठी गेला होता. दरम्यान पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला होता. सुशील बैलांना घेऊन नदी काठी गेला असताना बैलांना अंघोळ घालत होता. यावेळी नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. काही कळायच्या आतच पाण्याच्या लाटांमध्ये तो बुडाला.

सदरची घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजताच त्यांनी सुशीलला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला. या घटनेमुळे इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बैलपोळा सणाच्या उत्साहावर पाणी फिरविणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते.

Leave a Comment