संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या अनेक वर्षापासून परंपरेनुसार आजतागायतही दरवर्षी न चूकता संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यंदाच्या वर्षी देखील बिरेवाडी ग्रामस्थांनी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
गावातील सर्व शेतकरी आपल्या सर्जा राजाला नटून थाटून बिरेवाडी सोसायटीजवळ एकत्र आले होते. यावेळी सर्जा राजाला शेतकऱ्यांनी बैलांवर निरनिराळे गोंडे, पायाला घुंगराचा पट्टा, पाठीवर रंगबिरंगी झुल, पितळी घंटा, प्लास्टिकची कवड्यांच्या माळांनी सजवले होते.
तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरासह गुलालाची उधळण करीत हनुमान मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी अक्षरशः सनई सुरांच्या आवाज अन् पारंपरिक वाद्यांवर लेझीम नृत्य सादर केले. मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला गुडघ्यावर बसून हनुमानरायांच दर्शन दिलं. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरेवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून बैलपोळा आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतकऱ्यांसमवेत कायम शेतात राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाला बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी अंघोळ घालतात. त्यानंतर बैलाला पुर्णपणे सजवल जात. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असून वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांविषयी बिरेवाडी ग्रामस्थ कृतज्ञता व्यक्त करतात.
