यवतमाळमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. यवतमाळच्या मारेगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते नुकतेच पोलीस निरीक्षक म्हणून मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. उमेश बेसरकर यांची पुसद येथून मारेगाव येथे १४ जून २०२५ रोजी बदली झाले होती. बेसरकर हे मूळचे नागपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्तव्य बजावत असताना अचानक उमेश बेसरकर यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यांना उपचारांसाठी यवतमाळच्या वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ठाणेदार उमेश बेसरकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मारेगाव बाजारपेठेत सन्नाटा पसरला आहे.
