हिरेवाडीतील गणेशनगरात हरिनामाचा गजर, अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) एकिकडे गणेशोत्सव सुरू असताना दूसरीकडे हरिनामाच्या गजराने संगमनेर तालुक्यातील हिरेवाडी येथील गणेशनगर दुमदुमून गेल्याच बघायला मिळाले. कारण गेली सात दिवस हिरेवाडीकर अखंड हरिनाम सप्ताहात मग्न झाले होते. ३० ऑगस्ट रोजी या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला होता. मात्र या सप्ताहाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी गणरायाच्या साक्षीने झालीय. ह.भ.प यशवंत महाराज थोरात यांनी काल्याच्या किर्तनाचे पुष्प गुंफले. यावेळी समस्त ग्रामस्थ मनोभावाने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान गेल्या २९ वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह आजतागायतही अविरत चालू असल्याची परंपरा आहे. यंदाच्या वर्षीच्या सप्ताहाची हिरेवाडी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच नामांकित किर्तनकारांनी सेवा देत किर्तनरूपी पुष्प गुंफले. सात हरिनामाचा गजराने हिरेवाडीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, भाजप नेते बुवाजी खेमनर, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सागर, कोंडाजी कुदनर, बजरंग दलाचे संतोष खेमनर, निवृत्ती खेमनर, नामदेव खेमनर, मच्छिंद्र खेमनर यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment