बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, मोठी अपडेट समोर 

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आला आहे. अशातच आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

या भेटीत महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच अंबादास दानवे यांची मुदत संपल्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरही चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार असून सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमीन पटेल यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जवळपास ४० ते ५० मिनिटे उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ 29 ऑगस्टला पूर्ण झाला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही आहे. सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा केल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment