जुन्नर – स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांची परवानगी न घेता, मिरवणूक काढणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांना चांगलेच भोवले आहे. जुन्नर बाजार समितीच्या आवारातून वाढदिवसाचा जल्लोष करत सुरु झालेल्या मिरवणूकीत, पुढे वाद्य वाजविणार्या झांजपथकातील वादकांच्या अंगावर गेल्याने, एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास घडली. पुण्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
आदित्य सुरेश काळे (वय २१, रा. शिवेची वाडी, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, तर गोविंद शंकर काळे (३३), विजय हिरामण केदारी (२४), सागर सुनील केदारी (२६), बाळू किसन काळे (२९), सचिन गणपत केदारी (३२, सर्व रा. शिवेची वाडी) आणि किशोर रामचंद्र घोगरे (३५, रा. सोमतवाडी, ता. जुन्नर) हे यात जखमी झाले आहेत.
माजी झेडपी अध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम सखाराम लांडे व त्यांचा मुलगा अमोल देवराम लांडे (दोघे रा. बोडकेनगर, जुन्नर); तसेच डीजे सिस्टीम मालक सौरभ वाल्मीक शेखरे (रा. जुन्नर) आणि डीजेचालक नामदेव विठ्ठल रोकडे (रा. सुराळे, ता. जुन्नर) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे आणि पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. या प्रकरणी धोंडू भिका काळे (रा. शिवेची वाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी परवानगी न घेता वाढदिवसाची मिरवणूक काढून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली. मिरवणुकीदरम्यान देवराम लांडे व अमोल लांडे यांनी हातवारे करून डीजेची गाडी पुढे घेण्यास सांगितले. चालकाने भरधाव गाडी चालवून समोर वाद्य वाजवत पायी जाणाऱ्या झांज पथकातील वादकांना धडक दिली. यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.
एकुलता एक मुलगा गमावला
आदित्य हा माणिकडोह ‘आयटीआय’ मध्ये शिक्षण घेतानाच, स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अन्य वेळी तो झांजपथकात वादन करत होता. त्याला मोठी बहीण असून, ती पोलिस खात्यात आहे, तर आदित्यचे वडील सुरेश काळे हे खामगावचे उपसरपंच आहेत. एकुलत्या एक मुलाचा या दुर्घटनेत बळी गेल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयासमोर टाहो फोडला होता.
