चिंचेवाडी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव, ग्रामस्थ आक्रमक, थेट “त्या” टपऱ्यांवर जाऊन…..

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभानिमित्त वार – बुधवार दि.17 सप्टेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी गृप ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच शांताबाई कुदनर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविणे, PMAY टप्पा क्र. ०२ मधील घरकुल योजनेचे अपात्र लाभार्थी वगळणे, दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करणे, तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र या ग्रामसभेत अवैध दारू विक्रेत्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्याने ग्रामसभेत एकच गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले.

कारण गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत हद्दीतील काही टपऱ्यांवर सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्याने या विरोधात ग्रामसभेत आवाज उठविण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी टपऱ्यांवर अवैध दारू विक्री होत आहे त्या टपऱ्यांवर ग्रामस्थांनी जाऊन दारू बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत आजपासून दारू विक्री बंद करण्यात यावी असे ठणकावून सांगितले.

मात्र काही महिन्यांपूर्वी अवैध दारू विक्री होत असल्याबाबत घारगाव पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते. परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई न करता उलट त्यांच्याच आशिर्वादाने अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. तसेच या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई का केली नाही? आता यावरच मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. तसेच अवैध दारू विक्रेत्यांविरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे.

तसेच दारूबंदी बाबत पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना तसा पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अवैध दारू विक्रेत्यांविरोधात प्रशासन काय कारवाई करणार आता याकडेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment