पुणे – नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू झाला असून, गेल्या २४ तासांत मान्सून राजस्थानच्या आणखी काही भागासह गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून परतला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार, तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुढील ४८ तासांत राज्यातील कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. दि. १७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल.
तसेच रायगड, पुणे व सातारा जिल्ह्यासह घाट परिसर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
