दसऱ्यामुळं ट्रॅक्टर धुवायला गेले अन् चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू ; ‘या’ गावावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर : दसरा सणानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळूज परिसरातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

इमरान इसाक शेख हा दसऱ्यानिमित्त आज दुपारी शेतालगत असलेल्या गायरान जमिनीमधील मुरूम उपसल्यानंतर पडलेल्या खड्ड्याच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत कुटुंबातील इमू पठाण, जोहान पठाण आणि गौरव तारक ही तीन लहान मुले होती.

ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले बुडत असल्याचं बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दसऱ्याच्या सणादिवशीच मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment