संगमनेर(DSNews24 / किरण पुरी) गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा धूरळा उडणार आहे. संगमनेर तालुक्यात ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गण आहे. येत्या १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे गटात व गणात काय आरक्षण लागेल याचीच उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. मात्र ही उत्सुकता १३ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साकूर गटात पिंपळगाव देपा व साकूर असे पंचायत समितीचे गण आहे. त्यामुळे या गटात व गणात काय आरक्षण लागेल अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मागील निवडणुकीवेळी या गटात महिला आरक्षण होते. त्यामुळे आता पुन्हा नवीन आरक्षण काय लागेल अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे. तसेच इच्छुकांनी काही महिन्यांपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र आपला गट आरक्षित होऊ नये यासाठी इछुकांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहे.
मात्र चर्चेनुसार साकूर जिल्हा परिषद गटात “ओबीसी किंवा खुला” हे आरक्षण लागण्याची शक्यता आहे. तसे गणिते देखील जुळविली जात आहे. मात्र नेमकं आरक्षण सोडत काय जाहिर होणार हे १३ ऑक्टोबर रोजीच स्पष्ट होणार आहे.
परंतु साकूर गटाशेजारील एक जिल्हा परिषद गट आरक्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या गटातील दोन मातब्बर नेत्यांना निवडणूकीसाठी दूसरा गट शोधण्याची वेळ येऊ शकते. तसेच त्या गटातील एका युवा नेत्याचा तालुक्यासह जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे “त्या” युवा नेत्याने साकूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी जोरदार चर्चा पठारभागात सुरू आहे. तसेच जर कदाचित साकूर गटात ओबीसी किंवा खुला आरक्षण निघाले तर पुढील राजकीय चित्र वेगळे बघायला मिळू शकते व पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर उमेदवार देताना पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात साकूर जिल्हा परिषद गटात खळबळजनक घडामोडी घडणार असल्याचे चित्र आहे. परंतु “तो” नेता महाविकास आघाडीचा आहे की महायुतीचा? अशी चर्चा सध्या पठारभागात सुरू आहे. मात्र नेमकं आरक्षण सोडत काय जाहिर होणार हे आता 13 ऑक्टोबर रोजी कळणार आहे. पण त्या आधीच इच्छुकांची धकधक वाढली आहे.
