मुंबई (DSNews24 ) पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्यास राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे प्रमुख ॲड. रामदास घावटे यांनी दिली आहे. कारखाना बचाव समितीने याबाबत राज्य शासनाकडे पुनर्जीवनाचा प्रस्ताव सादर केलेला आहे.
पारनेरचे विधानसभा सदस्य काशिनाथ दाते सर यांच्याकडे या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार दाते यांच्या विनंतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात कारखाना बचाव समिती, भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सोबत बैठक आयोजित केली होती.
या साखर कारखान्याची चुकीच्या मार्गाने विक्री झाल्यामुळे राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपणी विरुद्ध गुन्हे दाखल झाले असुन तपास चालु आहे. त्यामुळे आता या साखर कारखान्याचे पुर्नजिवन कसे करता येईल याबाबतचे सविस्तर सादरीकरण कारखाना बचाव समितीने केले. यावेळी बैठकीत पुनर्जीवनाविषयी सविस्तर चर्चा झाली. कारखान्याचे काही मुद्दे राज्याचे महसूल आणि जलसंपदा खाते यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येवून पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे यावेळी ठरले.
बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, अशोक सावंत, अँड. रामदास घावटे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, बाळासाहेब बोरकर, साहेबराव मोरे, बबन कवाद, दिगंबर लाळगे, बाळशिराम पायमोडे, महेंद्र पांढरकर, संतोष यादव, सुनिल चौधरी, शंकर गुंड, जालिंदर लंके, रोहिदास लामखडे, बबनराव सालके, संभाजीराव सालके, बाबाजी गाडीलकर, रामदास सालके, संतोष सालके, गोविंद बडवे, बाळासाहेब वाळुंज, संजय वाखारे उपस्थित होते.
