अहिल्यानगर : श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे प्रकाश चित्ते यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये नेत्यांचे पक्षप्रवेश आणि स्थानिक समीकरणे सांभाळण्याची चढाओढ लागली आहे.
ठाण्यात शिंदेसेनेत जाहीर प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील स्व. गंगुबाई शिंदे सभागृहात प्रकाश चित्ते यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक किरण लुनीया, संजय पांडे, बबन मुठे, सोमनाथ कदम यांच्यासह सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. भाजपमधील अंतर्गत कुरघोडी आणि राजकीय समीकरणांमुळे नाराज झालेल्या चित्ते यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या प्रवेशामुळे श्रीरामपूरमधील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील नेत्यांचाही शिंदेसेनेत प्रवेश
श्रीरामपूरसह नाशिक जिल्ह्यातही शिंदेसेनेने आपला प्रभाव वाढवला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे, त्यांचे पुत्र प्रशांत मुसमाडे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष प्रमोद मुसमाडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक तुषार शेटे, माजी नगरसेवक अनिल शेंडगे आणि माजी उपनगराध्यक्ष ॲड. अजय पगारे यांनीही शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. या नेत्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिंदेसेनेची ताकद वाढवली आहे.
शरद पवार गटालाही धक्का
अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटालाही मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्माताई माणिक जगताप, विद्या कांबळे, संगीता जगताप, रंजना जाधव, विशाखा दुर्गे आणि सविताताई पठारे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशांमुळे शिंदेसेनेने अहिल्यानगर जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
