जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रत्येक पक्ष तयारी करत असून राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशामध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे मंगळवारी (21 ऑक्टोबर) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे समोर आले आहे. ते चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार असून त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राजीव देशमुख हे 2009 ते 2014 या कालावधीत चाळीसगावचे आमदार होते. त्यांनी भाजपचे साहेबराव घोडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यावेळी भाजपचे उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली.
पण, यावेळी भाजपचे मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला. राजीव देशमुख यांचे वडील अनिल देशमुख हे चाळीसगाव नगरपरिषदेचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिले होते. तर त्यांचे काका प्रदीप देशमुख हे जळगाव जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. स्वतः राजीव देशमुख देखील जिल्हा बँकेचे माजी संचालक होते.
