पारनेर(DSNews24 /किरण पुरी) नुकताच चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) परीक्षेचा निकाल लागला असून या परिक्षेत पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील कु. काजल मच्छिंद्र ढोकळे हिने दैदिप्यमान यश मिळवून खडकवाडी गावातील पहिली ‘सी.ए.’ बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्यामुळे खडकवाडी गावाचा नाव उंचावले आहे.
काजल हिचे हे यश केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण भागासाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. संघर्षमय प्रवास आणि असामान्य जिद्द काजल ढोकळे हिची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य आहे. तिचे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात चालक म्हणून कार्यरत होते, मात्र एका अपघातानंतर त्यांना नोकरी गमवावी लागली. या बिकट परिस्थितीतही तिच्या आईने मोलमजुरी करून काजलच्या शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतली. आईच्या या त्याग आणि परिश्रमामुळेच काजलचे प्राथमिक शिक्षण खडकवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (इयत्ता चौथीपर्यंत) झाले. पुढे तिने नूतन माध्यमिक विद्यालय, खडकवाडी येथे १० वी पर्यंतचे आणि त्यानंतर भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहिल्यानगर येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
बीकॉमला प्रवेश घेतल्यानंतर तिला सी.ए. विशाल रांका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याच टप्प्यावर तिने ‘सी.ए.’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि या स्वप्नपूर्तीसाठी तिने प्रचंड संघर्ष केला. १६ तासांचा अभ्यास आणि आर्टिकलशीप सी.ए. बनण्याचे ध्येय गाठण्यासाठी काजलने अभ्यासात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. ती सलग १६ तास अभ्यास करत असे, ज्याच्या बळावर तिने सी.ए. इंटरमिजेट परीक्षेत यश मिळवले.
पुणे येथे बोरकर ॲन्ड मुजुमदार या नामांकित फर्ममध्ये तिने आपल्या तीन वर्षांची आर्टिकलशीप (प्रशिक्षणाचा काळ) यशस्वीरित्या पूर्ण केली.आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिनेआर्टिकलशीपनंतर नोकरी स्वीकारली आणि नोकरी करत असतानाच तिने सी.ए. अंतिम परीक्षेची तयारी सुरू ठेवली. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि स्वतःच्या कमाईतून खर्च भागवत तिने अभ्यास केला आणि अखेर यशाला गवसणी घातली. काजलच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
