साकूर गटातून १९८० ते २०१७ पर्यंतचे विजयी झेडपी सदस्य? अशा झाल्या लढती, किरण पुरींचा खास रिपोर्ट

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) सध्या जिल्हा परिषदेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ज्या त्या गटात व्युहरचना आखायला सुरुवात केली आहे. परंतु गेल्या दोन दशकांपासून म्हणजेच २००२ ते २०१७ पर्यंत संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेस पक्षाचाच झेंडा फडकला आहे. या गटात कायमच थोरात विरूद्ध विखे असा सामना रंगला होता. आजही तीच परिस्थिती आहे. साकूर गटात कॉंग्रेस व भाजपचे मातब्बर नेते देखील आहे. त्यामुळे या गटातील निवडणूकीकडे सर्वांचेच कायम लक्ष लागून असते. तसेच या गटात या आधीच इतिहास बघितला तर कॉंग्रेसचाच दबदबा असल्याचे दिसून येत आहे. साकूर जिल्हा परिषद गटातून आजपर्यंत कोण कोण जिल्हा परिषद सदस्य झाले याचा DSNews24 ने आढावा घेतलाय.

विखे गटाचे भिमराज गिते विजयी

साधारणपणे १९८० – ८१ काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून दादासाहेब गहिणाजी हजारे व विखे गटाकडून भिमराज विठोबा गिते रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत विखे गटाचे भिमराज गिते यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्या काळात काही कारणास्तव भिमराज गिते यांना जवळपास ११ वर्षं जिल्हा परिषद सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.

कॉंग्रेसच्या सुनंदाताई भागवत विजयी

तसेच सन १९९२ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसकडून सुनंदाताई भागवत व भाजपकडून सखुबाई डोलनर रिंगणात उतरल्या होत्या. यावेळी या निवडणुकीत कॉंग्रेसकडून सुनंदाताई भागवत यांनी बाजी मारली होती.

विखे गटाच्या सखुबाई डोलनर विजयी

तसेच सन १९९७ साली झालेल्या निवडणुकीत विखे गटाकडून सखुबाई डोलनर पुन्हा निवडणूकीत उतरल्या होत्या. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून विजया बाबासाहेब दातीर यांनी फाईट दिली होती. सखुबाई डोलनर यांनी १९९२ च्या निवडणूकीत झालेल्या पराभवाची सल या निवडणुकीत भरून काढत दणदणीत विजय मिळवला होता.

कॉंग्रेसचे स्व. अशोकराव खेमनर विजयी 

सन २००२ साली कॉंग्रेसकडून स्व. अशोकराव बाजीराव पा खेमनर यांनी उमेदवारी केली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून बाळासाहेब कोंडाजी खेमनर दंड थोपटले होते. अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचे स्व. अशोकराव खेमनर विजयी झाले होते. ही निवडणूक चांगलीच गाजली होती.

कॉंग्रेसचे मारूती केदार विजयी

त्यानंतर सन २००७ साली कॉंग्रेसकडून मारूती यमना केदार तर राष्ट्रवादीकडून रामराव जाणकू दुधवडे यांचा सामना झाला होता. या निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेसचे मारूती केदार यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

कॉंग्रेसचे सत्यजित तांबे विजयी

तसेच सन २०१२ साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी २००२ साली निवडणूक लढविलेल्या बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांनी पुन्हा या निवडणुकीत दंड थोपटले होते. ही निवडणूक चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी कॉंग्रेसचे सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला होता.

कॉंग्रेसच्या मिराताई शेटे विजयी 

त्यानंतर २०१७ साली साकूर जिल्हा परिषद गट महिला आरक्षित झाल्याने कॉंग्रेसने मिराताई पांडुरंग शेटे यांना मैदानात उतरविले. त्यांच्या विरोधात भाजपने हिराबाई हरीभाऊ गिते यांना तिकीट दिलं होतं. अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसच्या मिराताई शेटे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. यावेळी मिराताई शेटे यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीची देखील संधी मिळाली.

कॉंग्रेस सावध…. 

साकूर जिल्हा परिषद गटाचा इतिहास बघता कॉंग्रेसचेच प्राबल्य दिसून येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत जी चूक झाली, ती चूक या निवडणुकीत होणार नाही याचीच काळजी सध्या कॉंग्रेसचे नेते घेत आहेत. तसेच महायुतीकडून देखील तालुक्यात परिवर्तन झाल्याने उत्साह संचारला आहे. त्यामुळे त्यांनी देखील तशी तयारी केली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाच्या लाटेत आमदार अमोल खताळ विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीत साकूर जिल्हा परिषद गटात कॉंग्रेसने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना १३०० मतांच लीड दिले होते. त्यामुळे आता सध्याच्या निवडणूकीत आगामी काळात कशी परिस्थिती राहणार हे दिसून येणार आहे.

Leave a Comment