बैठकीत तोडगा नाहीच! विखे पाटलांच्या कार्यालयावर लॉंग मार्च निघणारच

मुंबई/अहमदनगर : शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व इतर समविचारी संघटनांनी 26, 27 व 28 एप्रिल रोजी महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा लॉंग मार्चचे आयोजन केल आहे.

किसान सभेने केलेल्या मोर्चाच्या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने किसान सभेच्या शिष्टमंडळाला 25 एप्रिल रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी आमंत्रित केले. चर्चेत किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, डॉ. उदय नारकर, किसन गुजर, रामू पागी, संजय ठाकूर, अमोल वाघमारे, अजय बुरांडे, विश्वनाथ निगळे, सीटूचे नेते डॉ. विवेक माँटेरो, इत्यादींनी सहभाग नोंदवला. तर राज्य शासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व इतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आता अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

महसूल मंत्र्यांसोबतची ही बैठक सुमारे तीन तास चालली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी इतर कोणत्याही खात्याचे मंत्री हजर नसल्याने मोर्चाच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांविषयी कोणताही ठोस निर्णय निघू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पायी मोर्चा ठरल्याप्रमाणे 26 एप्रिल रोजी अकोले येथून नियोजित वेळेला दुपारी तीन वाजता निघणार असल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे. हा मोर्चा लोणी येथील महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर 28 एप्रिलला सायंकाळी पोहोचेल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चाचे रूपांतर बेमुदत महामुक्काम आंदोलनात होईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर, बाकी प्रलंबित शेती प्रश्नांसाठी किसान सभेने, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

या लाँग मार्चला नगर जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेनीही जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सक्रिय सहभाग घेऊन लाँग मार्च मध्ये सामील होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे या लॉंग मार्चमध्ये हजारो शेतकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

श्री. वाडेकर म्हणाले की, सन २०१७ व २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी या योजनेत योग्य ते बदल करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. दुग्ध पदार्थ आयात करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरू असून त्या त्वरित थांबाव्यात शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला उत्पादन खर्चावर आधारित प्रति लिटर किमान 45 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 65 रुपये भाव देण्यात यावा.

महाविकास आघाडी सरकारने दूध एफ आर पी बाबत स्थापन केलेल्या अजित पवार समितीच्या शिफारशी जाहीर कराव्यात दूध भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रस्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्यावी, परतीच्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. सरकारने ऐन डी आर एफ अंतर्गत मदतीची घोषणा केली मात्र सदर पंचनामे व दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे एन डी आर एफ च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत तातडीने जाहीर करावी.

वीज बिलांची सक्तीची वसुली थांबून विज बिल सरसकट माप करून शेतीला पूर्ण दाबाने दिवसा बारा तास वीज देण्यात यावी, विजेच्या तारांचे शेतात पडलेले झोळ दुरुस्त करून वीज वाहिन्यांची राज्यभर दुरुस्ती करावी.

पारनेर तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळी तालुका म्हणून ओळख पुसण्यासाठी कुकडीचे १ टी.एम.सी पाणी कान्हूर पठारच्या पठार भागाला मिळावे, त्या संदर्भात त्वरित सर्वे करण्यात यावा. २०१८ साली पिक विमा मंजूर होऊनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत देण्यात आलेला नाही संबंधित कंपनीची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे संतोष वाडेकर यांनी सांगितले आहे.

 

अकोले ते लोणी पायी मोर्चाचा कसा असेल मार्ग?

दिनांक 26 एप्रिल 2023

अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ, ता. संगमनेर : 12 किलोमीटर

 

दिनांक 27 एप्रिल सकाळी

रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ ते खतोडे लॉन्स : 10 किलोमीटर

दिनांक 27 एप्रिल दुपारी

खतोडे लॉन्स ते जनता विद्यालय, वडगाव पान : 9.6 किलोमीटर

 

दिनांक 28 एप्रिल सकाळी

वडगाव पान ते समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी : 11 किलोमीटर

दिनांक 28 एप्रिल दुपारी

समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी ते लोणी : 10 किलोमीटर

Leave a Comment