शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही राहुल गांधींच्या काँग्रेससोबतही युती करायला तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे यांना आम्ही यापूर्वी सावध केलं होतं, की पुढे रेड झोन आहे, गाडी फेल होईल आपण जाऊ नका. इथेच गाडी थांबवली पाहिजे, रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र संजय राऊतसारखे चुकीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर भेटले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे गाडी भरकटली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे. हिंदुत्वाकरता केलेली आहे. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकतो हे कधीच होणार नाही. बाळासाहेबांनी पूर्ण आयुष्य काँग्रेस विरोधात घातलं.
काँग्रेसवाल्यांनी आमच्या पाठी फोडल्या, त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधींना भगवा झेंडा हातात घ्यायला सांगा, आम्ही त्यांच्यासोबत युती करायला तयार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
