साकूर ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय ; ५० टक्के कर सवलत 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या थकबाकीदारांना मोठा दिलासा देत साकूर ग्रामपंचायतीने १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरपंच सचिन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत मंजूर केला आहे.

ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ या चालू वर्षाचा कर एकरकमी भरल्याशिवाय ही सवलत मिळणार नाही. तसेच १ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकी भरताना फक्त ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. उर्वरित ५० टक्के रकमेची पूर्ण सवलत राहील. ही सवलत फक्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या कालावधीत म्हणजे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच लागू असणार आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment