संतप्त मतदाराने EVM मशीनच फोडले, घडला भलताच प्रकार 

चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंगळवारी (दि.२) प्रभाग क्रमांक ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे ईव्हीएम मशीनवरून मोठा वाद निर्माण झाला.

सायंकाळी मतदानाला आलेल्या राम मल्लेश दुर्गे (वय ४०) या मतदाराने ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबताच अचानक बाजूला असलेल्या भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागल्याचा गंभीर आरोप करत संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडून टाकले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मतदाराचा आरोप आणि मशीन फोडल्याची घटना समजताच केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. संतप्त नागरिकांनी “भाजप मुर्दाबाद”च्या घोषणा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला. परिणामी काही वेळ मतदान प्रक्रियेलाच ब्रेक बसला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, गडचांदूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून ईव्हीएम मशीन जप्त केले.

Leave a Comment