संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतीला पाणी भरण्यासाठी मुश्किल झाले आहे. त्यासाठी शेतीपंपाचा रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांसमवेत १२ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांनी उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला आहे. तसेच शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
साकूर महावितरण अंतर्गत गावांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्या स्थितीत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत; शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात थांबल लागत. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात काही ठिकाणी मानवहानी झाल्याची घटना देखील घडली आहे. त्यामुळे साकूर परिसरातील शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. तसेच या मागणीकडे विशेषतः उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी लक्ष वेधले.
तसेच जर दिवसा वीजपुरवठा झाला नाही तर १२ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांसमवेत थेट आंदोलन करण्याचा इशारा महावितरण कंपनीला दिला होता. त्यानंतर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा यांनी उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्याशी चर्चा करत यावर तोडगा काढला. सद्यस्थितीत काही गावांमध्ये दिवसा वीजपुरवठा होत असून जे गावे बाकी आहे त्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल अशी चर्चा झाली. त्यामुळे आता साकूर महावितरण अंतर्गत गावांमध्ये शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
