बापरे! बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, साकूर पठार भागात खळबळ, वनविभाग अलर्ट…. 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच नागरिकांना बिबट्याचे दर्शन देखील होताना दिसत आहे. त्यामुळे पठार भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जीव मुठीत धरून जावं लागतं.

अशातच मांडवे बुद्रुक येथे बिबट्याने अनिल मच्छिंद्र माळी वय ३४ या शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना वार – बुधवार दि. १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलीय. घरासमोर बिबट्याने अनिल माळी यांच्यावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याने अनिल माळी यांच्या डाव्या पायाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वनविभागाच्या वतीने मांडवे बुद्रुक येथे पिंजरा लावला आहे.

बिबट्याचा वाढता संचार बघता पठार भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्या कधीही निदर्शनास पडत आहे. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून कामानिमित्त परिसरात फिराव लागत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बिबट्याची भिती वाटत आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी पठार भागातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment