उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा धक्कादायक मृत्यू 

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. जावेद पठाण असे मृत उमेदवाराचे नाव आहे. ते ६६ वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरमधील उमेदवार जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. ते मंगळवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जावेद पठाण यांच्या मृत्यूने मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने राजकारणासहित सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment