मोठी बातमी! राज्यातील “या” ठिकाणी १५ जानेवारीला सुट्टी जाहीर 

मुंबई: राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर आता चांगलाच वाढला आहे. रॅली, प्रचार सभांमुळे सर्वत्र नेत्यांची एकच भाऊगर्दी झाली आहे. एकीकडे प्रचाराला रंग चढला आहे तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने आता मोठी घोषणा केली आहे. राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी संबंधित मतदान क्षेत्रामध्ये १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पुढील आठवड्यात गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, मंडळं इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

तर रायगड, कोकण, गडचिरोलीसह इतर भागांमध्ये महापालिकेची निवडणूक होत नाहीये, त्या ठिकाणी सुट्टी नसणार आहे. तसंच, या सगळ्या २९ भागांमध्ये शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर असणार आहे.

Leave a Comment