पुणे: भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे (Mahesh Landge) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्राचे आका आहेत, अशी जहरी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली होती त्यावर अजित पवारांनी चार शब्दांत विषय संपवला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा लांडगेंनी अजित पवारांना डिवचलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असं म्हटलं अन् संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले. आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होणारेत असं म्हणत भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) असा निशाणा साधला.
लांडगेंची एकेरी भाषेत टिका
मात्र त्यांची ही वक्तव्य भाजपलाचं अडचणीत आणणारी ठरू शकतात. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला. त्यानंतर संतापलेल्या लांडगेंनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको, असे एकेरी भाषेत लांडगेंनी टीका केली आहे. आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आलीये, असा इशारा ही महेश लांडगेंनी थेट अजित पवारांना दिला आहे. आपले देवा भाऊ शांत बसतात, पण एखाद्याला इशारा देतात. त्याला तो इशारा समजला की मग 70 हजारांचा घोटाळा करणारे पण आपले घोटाळा काढणारे जमा होतात, असं ही लांडगे बोलून गेलेत.
अजित पवार महाराष्ट्राचे आका
उपमुख्यमंत्री अजित पवारचं महाराष्ट्राचे आका आहेत. अशी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा. मुळात ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावं असे महेश लांडगे म्हणाले. मला पिंपरी चिंचवडचा ते आका म्हणतायेत, मुळात तेच महाराष्ट्राचा आका आहेत असा पलटवार करत एकेकाळचे वस्ताद असलेल्या अजित दादांना पैलवान महेश लांडगेंनी कुस्तीचं आव्हान दिलं आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थाने पूर्वीचे वस्ताद अजितदादा विरुद्ध पैलवान महेश दादा अशी लढाई पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात सुरु झाली आहे. सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय, ते नैराश्यात आहेत, अशी घणाघाती टीका लांडगेंनी केली.
पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, असा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर लांडगे ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत असे लांडगे म्हणाले. मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पाहा असेही लांडगे म्हणाले. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असा सवाल देखील लांडगेंनी केला आहे
