भारतीय हवामान विभागाने (IMD)समुद्र किनारपट्टीच्या भागात राहाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या ६ मे रोजी दक्षिण- पूर्व बंगालच्या उपसागराला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
देशावर मोचा चक्रीवादळाचं (Cyclone Mocha) नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे २०२३ या वर्षातील पहिलं चक्रीवादळ ठरणार आहे.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पाच दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याने पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
याशिवाय, उत्तर प्रदेशात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते.
पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.
