बिरेवाडीत कोंबडीच्या नादात बिबट्या फसला, नेमकं काय घडलय… 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) दोन तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी शिवारात धूमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटेच्या सुमारास अडकला आहे. साकूर परिसरात २५ दिवसांत तिसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. २२ डिसेंबर रोजी मांडवे बुद्रुक येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे आणि एक बछडा पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर बिरेवाडी येथे तिसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी सरपंच लहानू सागर यांच्या वस्तीवर बिबट्याने धूमाकूळ घातला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्या ताब्यात घेतला आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, बिरेवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धूमाकूळ घातला होता. शिवडी वस्ती येथे मालक सागर यांच्या घरासमोरच बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. तसेच माजी सरपंच लहानू सागर यांच्या वस्तीवर देखील बिबट्याने धूमाकूळ घातला होता. त्यामुळे महिला, पुरूष, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराबाहेर नागरिकांना पडणेही मुश्किल बनले होते.

सामाजिक कार्यकर्त्या निलम खताळ यांनी घेतली होती दखल

दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या निलम खताळ बिरेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी निलम खताळ यांच्या कानावर बिबट्याच्या दहशतीचा प्रकार घातला होता. निलम खताळ यांनी तातडीने वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती. अवघ्या दोन तासात वनविभागाने तातडीने माजी सरपंच लहानू सागर यांच्या घरासमोरच पिंजरा लावला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी निलम खताळ यांचे आभार मानले होते. पिंजरा लावल्यानंतर एका दिवसात बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

कोंबडीच्या नादात बिबट्या पिंजऱ्यात अडकला 

बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होण्यासाठी वनविभागाने माजी सरपंच लहानू सागर यांच्या घरासमोरच लावलेल्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवल्या होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास कोंबड्यांच्या शिकारीसाठी बिबट्या पिंजऱ्यात गेला अन् त्याच क्षणी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची बातमी सकाळी सकाळी परिसरात वाऱ्यासारखी बिरेवाडीत पसरताच शेकडो ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Leave a Comment