संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडीत बिबट्या डरकाळी फोडत धूमाकूळ घातला आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून बिरेवाडी परिसरात बिबट्याने नागरिकांचीच झोप उडविलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शिवडी वस्ती येथील मालक सागर यांच्या घरासमोरच रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत थेट कुत्र्याचा फडशा पाडलाय. या घटनेमुळे तर अक्षरशः भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. त्याचबरोबर माजी सरपंच लहानू सागर यांच्या वस्तीवर देखील बिबट्याने धूमाकूळ घातला.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या निलम खताळ या बिरेवाडीत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी बिबट्याच्या दहशतीचा प्रकार भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी निलम खताळ यांच्या कानावर घातला. त्यानंतर निलम खताळ यांनी तातडीने वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून पिंजरा लावण्याची मागणी केली. वनविभागानेही अवघ्या काही तासांतच माजी सरपंच लहानू सागर यांच्या घराजवळ पिंजरा लावला आहे. सदर घटनेची निलम खताळ यांनी तातडीने दखल घेतल्याने त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
