साकूर येथील सेंट्रल बँकेत आज जाण्याआधी “ही” बातमी वाचा, कारण…

संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) पाच दिवसांचा आठवडा करावा या प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी 27 जानेवारी रोजी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील राष्ट्रीयकृत बँका आज बंद असणार आहे. मात्र या संपामुळे बँकिंग सेवा अक्षरशः विस्कळीत झाली आहे. तसेच या संपाचा ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संपाचा फटका संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सेंट्रल बँकेच्या ग्राहकांना बसत आहे.

कारण साकूर येथे सेंट्रल बँकेची शाखा आहे. या शाखेत हजारो खातेदार आहेत. जवळपास २० ते २५ गावांचा दैनंदिन व्यवहार या बॅंकेत होत असतो‌. मात्र आज सेंट्रल बँकेचे कर्मचारी देखील संपावर गेल्याने बॅंक आज बंद आहे. मात्र नेहमीप्रमाणे बॅंकेतील ग्राहक व्यवहार करण्यासाठी आज बॅंकेत आले तर त्यांना बॅंक बंद असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच नेमकी बॅंक का बंद आहे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसल्याने त्यांचा नाहक हेलपाटा होताना दिसत आहे. मात्र बुधवार दि. २८ जानेवारी रोजी सेंट्रल बँक चालू असणार आहे.

संपाचे मुख्य कारण 

पाच दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी 2015 पासून प्रलंबित आहे. सध्याच्या नियमांनुसार, बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ 5 दिवस काम असावे. 5 दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचारी दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहेत, जेणेकरून कामाच्या तासांचे नुकसान होणार नाही.

संपात कोणत्या बँका सामील आहेत?

या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, यांसारख्या सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश आहे.

नेमकं काय कारण?

8 मार्च 2024 रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती. या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र, वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. गेल्या 9 महिन्यांपासून सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युनियनने संपाचे हत्यार उपसले आहे.

Leave a Comment