मोठी बातमी! झेडपी निवडणूकीनंतर शिवसेना खटल्याची सुनावणी, नवीन तारीख केली निश्चित 

महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता सर्वोच्च न्यायालयाने आता 18 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच सुनावणी होईल हे स्पष्ट झाले आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने शिवसेनेची सुनावणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग 2 दिवस घेण्याचे निश्चित केले होते. पण 21 तारखेला सुप्रीम कोर्टाने ऐनवेळी अरावली पर्वताचे प्रकरण हातावर घेतल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. त्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारी रोजी होईल असे सांगण्यात येत होते. पण त्या दिवशीही हे प्रकरण बोर्डावर आले नाही. अखेर आज सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 18 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हाती घेतले जाईल हे स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर ही तारीख नमूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाची सुनावणी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर घेण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष करत ही सुनावणी या निवडणुकांचा निकाल घोषित झाल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी घेण्याचे निश्चित केले आहे.

Leave a Comment