बिग ब्रेकिंग! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच….

बीड : भाजपच्या बड्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. बारामती अपघात प्रकरण ताजे असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये देखील बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. यामुळे त्या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचारसभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.

उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नियोजित कार्यक्रमांना विलंब झाला असला, तरी पंकजा मुंडे सर्व सभांना हजेरी लावणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंकजा मुंडे सुरक्षित असल्याचे समजताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Leave a Comment