बिग ब्रेकिंग! मंत्री गुलाबराव पाटलांच्या विमानाचे उड्डाण रद्द, कारण आलं समोर

लातूर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या बैठक घेण्यास बारामतीला येत असताना विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले.

या निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला. अखेर, तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळल्यानंतर राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मात्र, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यातील बडे नेते, मुख्यमंत्री, मंत्री विमान प्रवासाची विशेष काळजी घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्येही बिघाड असल्याने त्यांच्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. आता, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याही विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून अनेक मंत्री विमान आणि हेलिकॉप्टरने हवाई प्रवास करत आहेत. त्यासाठीच, गुलाबराव पाटील लातूर दौऱ्यावर असताना त्यांचे परतीचे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले आहे. Avocet एव्हिएशन कंपनीचे सहा आसन क्षमतेचे विमान लातूर विमानतळावरून साडेचारच्या सुमारास उड्डाण करणार होते. त्यासाठी, हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून आवश्यक क्लिअरन्स मिळण्याची प्रतीक्षा पाच वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, ठराविक वेळेत क्लिअरन्स न आल्याने पायलटने उड्डाणास असमर्थता दर्शवली. तसेच संध्याकाळी लातूर येथून विमान उड्डाणास मर्यादा अखेर आजचे हवाई उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा नाही, त्यामुळे गुलाबराव पाटील यांना रस्तेमार्गाने कारने प्रवास करावा लागला.

या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांना चारचाकी वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना व्हावे लागले. लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

Leave a Comment