बारामतीत सहयोग सोसायटीतील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट देत दिवंगत अजितदादांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले, त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली. यावेळी पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबीय देखील उपस्थित होते. पवार कुटुंबात जवळपास अर्धा ते पाऊण तास बैठक झाल्याचे समोर आले आहे.
सहयोग सोसायटीतील निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार घातलेला भलामोठा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी पुष्प वाहून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. ज्यावेळी अजित पवार यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांनी हात जोडले त्यावेळी पवार कुटुंबातले सगळेच भावुक झाले.
सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. अजित पवार यांच्या भगिनी देखील हुंदक्यांनी दाटल्या. पवार कुटुंबातल्या जावा देखील भावनिक झाल्या होत्या. पवार कुटुंबातल्या या हळव्या क्षणांनी उपस्थित सगळेच भावुक झाले.
