पिकअपच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, नगर जिल्ह्यातील घटना 

श्रीगोंदा -भावाला कामावर जाण्यासाठी सोडायला जात असताना भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुयातील काष्टी येथे घडली.

या अपघातात काष्टी गावातील गजाननवाडी येथील सचिन शिवाजी माने (वय ४२) आणि त्यांचे मोठे बंधू संतोष शिवाजी माने (वय ४५) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन माने हे पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील एका कंपनीत कार्यरत होते. कंपनीची बस काष्टी गावातील दत्त मंदिर परिसरात येत असल्याने सचिन यांना कामावर जाण्यासाठी बसच्या ठिकाणी सोडण्यासाठी त्यांचे मोठे बंधू संतोष माने हे दुचाकीवरून त्यांना सोबत घेऊन जात होते.

आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास काष्टी गावात नगर-दौंड रस्त्यावर श्रीगोंदा चौकात माने बंधूंच्या दुचाकीला नगरकडे जाणार्‍या भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या माने बंधूंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे काष्टी गावावर शोककळा पसरली असून अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.

Leave a Comment