सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या ‘उत्कर्षा’ लॉजमध्ये एक ३५ वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा तरुण व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारीला या लॉजवर राहायला गेला होता. इथं दोन दिवस तो वास्तव्यास होता. मात्र मध्यरात्री अचानक त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
अलंकार अशोक नाईक असं मृत आढळलेल्या ३५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील कर्वेनगर भागातील रहिवासी आहे. तो अलीकडेच पुण्यातून कोकणात फिरायला गेला होता. मात्र ही कोकण ट्रीप त्याची अखेरची ट्रीप ठरली आहे. कणकवलीतील लॉजमध्येच त्याचा मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अलंकार नाईक हा १३ फेब्रुवारी रोजी कणकवलीत आला होता. त्याने बस स्थानकासमोरील ‘उत्कर्षा’ लॉजमध्ये राहण्यासाठी रुम बुक केली होती. दोन दिवसांपासून तो याच लॉजमध्ये वास्तव्यास होता. सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास लॉजचा कर्मचारी पार्थ रंजन पोयेकर हा रुमचं भाडं विचारण्यासाठी अलंकारच्या रुमवर गेला होता.
पार्थने दरवाजा ठोठावला आणि वारंवार हाका मारल्या, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय बळावला. त्यानंतर पार्थने तातडीने लॉजचे मालक नंदकुमार आरोलकर यांना या घटनेची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मालकांनी तातडीने कणकवली पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांची धाव आणि तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बंद दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता अलंकार नाईक हा निपचित पडलेला आढळला. पोलिसांनी त्याला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मृत्यूचं गूढ वाढलं
अलंकार नाईक याचा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारण, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी पोलिसांनी त्याचा मृतदेह पाहिला, त्यावेळी त्याच्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळलेल्या अवस्थेत होत्या. यामुळे या मृत्यूबाबत अधिक संशय व्यक्त केला जात आहे. मयत अलंकार हा पुण्यातील कर्वेनगर भागातील रहिवासी असल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
