सख्खा भावांसह मोटारी चोरणारी टोळी जेरबंद, घारगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील घारगांव पोलीस ठाणे हद्दीत १४ शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपांची चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास घारगाव पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.‌ या प्रकरणी आरोपी किशोर सुरेश काळे, (वय 25 ) व सागर सुरेश काळे ( वय 23) अनिल देमाभाऊ काळे, (वय 27) सर्व रा. बाळंद्री, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून मोटारी व केबली जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी, केबली चोरी जाण्याच प्रमाण वाढत असल्याने विविध शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीच्या आधारावर घारगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्याने पोलिसांच कौतुक करण्यात येत आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, महेश गणपत हांडे (वय 33 वर्षे) रा. भोजदरी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांनी १६ फेब्रुवारी रोजी फिर्यादी दाखल केली होती. या फिर्यादीत महेश हांडे यांनी म्हटले की दि. 13 फेब्रुवारी 2026 ते दि. 14 फेब्रुवारी 2026 या दिवशी शेतात मोटार पंप लावण्यात आलेला होता. त्यानंतर मोटारपंप बंद करुन घरी गेलो. तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा मोटारपंप चालु करण्यासाठी शेतामध्ये आलो होतो. यावेळी त्यांना त्यांची मोटार पंप व त्याची कॉपरची केबल तसेच शेततळ्यामधील मोटार पंप व केबल मिळुन आली नाही.यावरुन त्यांची खात्री झाली की, त्यांचे बोर मधील व शेतळ्यामधील मोटार पंप व केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 40/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला आहे.

त्यानंतर या गुन्ह्याचा घारगाव पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला. यावेळी तपासात गोपणीय बातमीदारामार्फत व तांत्रीक तपासावरुन सदरचा गुन्हा किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे, अनिल देमाभाऊ काळे यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली. या तीनही आरोपींना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी घारगाव पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या केल्याचे कबुली दिली. आरोपींकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्यांनी घारगांव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 24/2026, 14/2026, 22/2026, 23/2026 व अदखलपात्र गुन्हा रजि.नं. 664/2025, 12/2026, 25/2026, 96/2026, 97/2026, 98/2026, 99/2026 प्रमाणे दाखल गुन्हे केल्याचे सांगुन चोरी केलेला खालील प्रमाणे मुद्देमाल काढुन दिलेला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पथकातील पोहेकॉ बी.वाय गोडे, पोकॉ प्रमोद गाडेकर, पोकॉ सुभाष बोडखे, पोकॉ सुरेश शेळके, पोकॉ अनिल भांगरे, पोकॉ महादेव हांडे, पोकॉ रोहिदास आंधळे, चालक चंद्रकांत मेढे, व श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोहेकॉ सचिन धनाड यांनी केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास घारगांव पोलीस करीत आहे.

Leave a Comment