संगमनेर(DSNews24) नाशिक पदवीधरचे आमदार तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्षा त्यांच्या पत्नी मैथिली तांबे, आई दुर्गा तांबे यांच्यासह नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर शेअर केल्यानंतर राजकीय चर्चांना तोंड फुटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. याचवेळी आमदार सत्यजीत तांबेसंगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना घेऊन विधिमंडळात दाखल झाले. तिथं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत, मुख्यमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांशी संवाद साधला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी साधलेल्या या टायमिंगने पुन्हा संगमनेरसह राज्यात चर्चांना राजकीय तोंड फोडलं. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीचा राजकीय पट पुन्हा चर्चेत आणला आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस सोडून अपक्ष निवडणूक लढली. भाजपने देखील उमेदवार दिला नाही. यामुळे सत्यजीत तांबेंना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बळ असल्याची चर्चा होती.
नाशिक पदवीधरच्या निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात सत्यजीत तांबे यांनी लढली अन् विजय देखील मिळवला. यानंतर विधानसभा निवडणुकीत, संगमनेर मतदारसंघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत संगमनेर नगरपालिकेत थोरात अन् तांबे यांनी वेगळी रणनीती आखली.
स्वातंत्रसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचं सिंह हे चिन्हं घेऊन, नगरपालिका निवडणूक लढली. सत्यजीत तांबे यांनी एकहाती रणनीती राबवत, नगरपालिका निवडणुकीत यश खेचून आणलं. थोरातांना देखील बळ मिळालं. या सर्व राजकीय घडामोडी संगमनेर होत असताना, तांबे अन् थोरात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ असल्याची चर्चा होते.
सत्यजीत तांबे यांच्या राजकीय निर्णयात, कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा सल्ला असतो, असे सांगितले जाते. आता संगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्षा मैथिली तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह सर्व नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांशी घडवून आणलेली भेट आणि त्यासाठी तांबे यांनी घेतलेला पुढाकार, तांबेंच्या या पुढाकाराला मुख्यमंत्र्यांनी या सर्व नगरसेवकांना भेट देत, दिलेला वेळ, यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यातूनच सत्यजीत तांबे पुन्हा सत्तेच्या दिशेने असल्याची चर्चांना जोर पकडला आहे.
