पुणे : पुण्यातील वाघोली, तालुका हवेली इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Sadgir) यांच्यात झाला.
हर्षवर्धन सदगीर यानं महेंद्र गायकवाड याला 4-2 असं पराभूत केलं. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी झाला.
महेंद्र गायकवाड यानं पहिल्या हाफमध्ये 1 गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं एक गुण मिळवत बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत 1-1 असा सामना बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याला एक्टिव्हिटी टास्क देण्यात आला, यात त्याला गुण मिळवता आला नाही. यामुळं हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. यानंतर हर्षवर्धन सदगीर यानं दोन गुण मिळवले. अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीर यानं 4-1 अशी आघाडी मिळवली.यानंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर यानं 4-2 असा विजय मिळवला
