संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गर्दीने खचाखच भरलेले मैदान अन श्वास रोखून बसलेले शेकडो कुस्तीशौकीन, प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवत आपल्या तालीमीच नाव गाजवणारे राज्यातील नामवंत मल्ल यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील कुस्ती आखाडा चांगलाच गाजवला. निमित्त होते पिरसावली बाबांच्या उत्सवाचे. ५ व ६ एप्रिल रोजी पिरसावली बाबांचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. हजारो भाविकांनी पिरसावली बाबांच दर्शन घेतले. यात्रोत्सवमुळ गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान यात्रा कमिटीच्या वतीने यंदा निकाली कुस्त्यांचा जंगी आखाड्याच आयोजन ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता बिरेवाडी गावठाण येथे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. यामुळे नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनानी दुपारी ४ वाजेपासूनच हजेरी लावली होती. यामुळे बिरेवाडी येथील गावठाणातील मैदान गर्दिने गजबलेले होते. गेल्या दोन दशकांपासून बिरेवाडी व कुस्ती हे एक अजोड समीकरणच बनले आहे. अनेक कुस्तीगीर घडविण्यात बिरेवाडीकरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यंदाची पिरसावली बाबांच्या यात्रेतील आखाड्याची स्थिती पाहता या गावची लाल मातीशी जुळलेली नाळ अधिकच घट्ट झाल्याचे दिसून आले. दुपारी सुरू झालेला आखाडा संध्याकाळी उशिरा पर्यंत सुरू होता.
सर्वच नामांकित मल्लांच्या कुस्त्या या आखाड्याकडे दिसून आल्या. बिरेवाडी गावचा ऐतिहासिक वारसा कुस्तीच्या बाबतीत समृद्ध आहेत. यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या या आखड्यामुळे गावचे गावपण आजही कायम असल्याचे दिसून आले. यात्रा कमिटीच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने आखाडा भरवण्यात आला असल्यामुळे पैलवान व कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी आखाड्यात नामवंत मल्लांसह, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, नागरिक, ग्रामस्थ, कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेनिमित्ताने छबिना मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, निकाली कुस्त्या आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा कमिटीच्या अचूक नियोजनामुळे पिरसावली बाबांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
