महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास क्षेत्रासाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात तब्बल 2 लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, तसेच बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांनंतर नियमित पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण 8669 नियमित पदे भरण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. विभागातील काही पदे रद्द करून त्याऐवजी 165 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे विभागाची रचना अधिक सक्षम आणि कार्यक्षम होणार आहे. अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
याशिवाय, विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी 2843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार असून, 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत.
या मोठ्या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच लहान मुलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणाशी संबंधित सेवा अधिक सक्षमपणे दिल्या जातील. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.
1. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता 12 वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे.
2. शैक्षणिक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.
3. डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.
4.उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
5. तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
6. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
7. सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
8. सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास) तसेच शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
9. विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
11. अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास)
12. आधार कार्ड
ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक आहे
