बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांची उमेदवारी हा राज्याच्या राजकारणातील चर्चेचा मुख्य विषय ठरला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसने अवघ्या एक तास अगोदर निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
त्यामुळे महायुतीकडून बारामतीची जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. अशातच सोशल मीडियावर सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार शरद पवार यांचा फोटो लावण्यात आल्याने ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
यातच आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला शरद पवार जातील, असे ते म्हणाले आहेत. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरील प्रश्नावर त्यांनी अधिकचे बोलणे टाळले. त्याला वेगळे कारण असल्याचे ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
“मी अनेकदा सांगितलं की अजित पवार आणि शरद पवार हे काय वेगळे नाहीत. हे एकत्रितच आहेतच. कौंटुबिक आहेत आणि त्याच्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला शरद पवार जातील.”
त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. खरंतर बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी होणारी कोणतीही निवडणूक राज्यभरात लक्ष वेधून घेते. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे या लढतीला अधिकच रंग चढला आहे.
राजकीय समीकरणे, कुटुंबातील मतभेद आणि स्थानिक पातळीवरील ताकद यामुळे बारामती पोटनिवडणूक राज्यातील सर्वात हाय-प्रोफाइल लढतींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
