पिकअपचा भयानक अपघात, नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू

सिन्नर: जागरण-गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पंचाळे गावातील कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. भीषण अपघातात पेटलेल्या पिकअपने (एमएच १५/जेसी ६३३३) नव दाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले.

सिन्नर तालुक्यातील पंचाळे-शहा रस्त्यावर शिंदेवाडी शिवारातील खाडे वस्तीलगत आयशर टेम्पो आणि पिकअप यांच्यात शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

या प्रकरणी प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर) या आयशर टेम्पो (एमएच १४/एमटी ३८३९) चालकाविरुद्ध मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांमध्ये शुभम गणेश नवले (वय २१) व रिंकू शुभम नवले (१९) हे नवविवाहित दाम्पत्य, त्यांची आजी मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (६८, सर्व रा. पंचाळे) व पीकअप चालक किरण रवींद्र मोरे (वय २३) यांचा समावेश आहे.

पिकअपमधील सुनीता गणेश नवले (३८), सचिन गणेश नवले (१८), दिव्या गणेश नवले (१७), समीक्षा अनिल गांगुर्डे (९), अदिती पांडुरंग आहेर (१३), आरती पांडुरंग आहेर (९) आणि देवांश किरण मोरे (२) जखमी झाले. अपघातात आयशर टेम्पोने पिकअपला सुमारे १०० फूट ओढत नेले.

एका चितेवर तिघांचा अंत्यविधी

अपघातात चालक किरण मोरे, तसेच पती-पत्नी शुभम व रिंकू नवले यांचे मृतदेह आगीत कोळसा झाले होते. त्यामुळे पंचाळे येथील स्मशानभूमीत या तिघांवर एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आला. मीराबाई गांगुर्डे यांच्यावर स्वतंत्र अग्निसंस्कार करण्यात आले. या वेळी नवले आणि मोरे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Leave a Comment